भीषण अपघातात निलंगा तालुक्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू..

**भीषण अपघातात निलंगा तालुक्यातील दोन अविवाहित तरुणांचा दुर्दैवी मृत्यू…

शिऊर व गौर गावांवर शोककळा; यात्रेच्या आनंदावर काळाचा घाव**

लातूर,दि.०५ (मिलिंद कांबळे)

निलंगा तालुक्यातील कवठा पाटी ते तुपडी दरम्यान आज दुपारी घडलेली एक हृदयद्रावक घटना दोन कुटुंबांचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करून गेली. यात्रेच्या आनंदाने, आप्तस्वकीयांना भेटण्याच्या ओढीने निघालेला प्रवास असा अचानक मृत्यूच्या दारात संपेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर झालेली भीषण धडक… आणि एका क्षणात दोन तरुणांचे प्राण हिरावले गेले. मागे उरले ते फक्त अश्रू, हंबरडा आणि आयुष्यभर न भरून येणारी पोकळी…
या भीषण अपघातात शिऊर येथील सोहेल रहीम शेख (वय २२, अविवाहित) यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला, तर गौर येथील अमर सुनील देशमुख (वय ३२, व्यवसाय – शेती, अविवाहित) यांना उपचारासाठी नेत असताना अखेरचा श्वास घेतला. या दुहेरी मृत्यूने शिऊर आणि गौर या दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून प्रत्येक घरात दुःखाचे सावट दाटून आले आहे.
सोहेल… घरचा एकुलता एक मुलगा… आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न… लहान बहिणीचा आधार… अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेला हा तरुण आपल्या कुटुंबासाठी काहीतरी मोठं करण्याच्या जिद्दीने झटत होता. वडील छोटासा व्यवसाय करून संसार चालवत होते, आणि सोहेल लातूर येथे पोलिस भरतीसाठी मेहनत घेत होता. घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची त्याची तयारी सुरू होती… पण नियतीला हे सुख मंजूर नव्हते.
आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरून (MH 24 Y 9778) तुपडी येथील आजोळी, उरुसाच्या निमित्ताने आई व बहिणीला भेटण्यासाठी आनंदाने निघाला… मनात उत्साह, डोळ्यांत स्वप्नं… पण काही अंतरावरच मृत्यू दबा धरून बसला होता.
कवठा पाटी ते तुपडी दरम्यान खडीकेंद्राजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी (MH 24 AL 8410) त्याची भीषण धडक झाली. अपघात इतका जबरदस्त होता की सोहेलने जागीच प्राण सोडले.
दुसऱ्या दुचाकीवरील अमर देशमुख हेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण अखेर अमर देशमुख यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अमर देशमुख… साधा, कष्टाळू शेतकरी… अवघ्या १ एकर शेतीवर संसार चालवणारा… आई-वडिलांचा आधार… अजून संसार थाटायचा होता… स्वप्नं पूर्ण करायची होती… पण आयुष्याची सुरुवातच होत असताना नियतीने त्यांना हिरावून नेले. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.
सोहेलच्या घरी जेव्हा त्याचा मृतदेह पोहोचला, तेव्हा आईचा आक्रोश, वडिलांचे नि:शब्द दुःख आणि लहान बहिणीचा हंबरडा पाहून संपूर्ण गाव सुन्न झाले. “आनंदाने गेला… आणि परत आला तो थंड देह बनून…”  या एका वाक्यात त्या कुटुंबाची वेदना सामावली होती.
अमर देशमुख यांच्यावर दिनांक ०६ एप्रिल रोजी सकाळी ०९ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तर सोहेल शेख यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शिऊर येथे आज सायंकाळी ०९ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या वेळी गावातील प्रत्येक डोळा अश्रूंनी भरून आला होता… प्रत्येक मन सुन्न झाले होते…
एका क्षणात दोन कुटुंबांचे आधारवड कोसळले…
दोन घरे उजाडली…
दोन गावांवर शोकसागर उसळला…
आणि मागे राहिल्या त्या फक्त आठवणी… अश्रूंनी भिजलेल्या आठवणी…

Comments

Popular posts from this blog

शेषेराव तात्या कांबळे यांचे निधन..

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...