निलंग्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारील नवीन वास्तुस डॉ .बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी...
निलंग्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारील वास्तुस बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी
निलंगा,दि १५(मिलिंद कांबळे)
भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या निलंगा जिल्हा (लातूर) येथील पुतळ्या शेजारी नवीन बनवलेल्या वास्तुस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, निलंगा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यासाठी येथील आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या आंबेडकर प्रेमी बांधवाना पक्ष ,संघटनांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला होता.अनेक वेळा निवेदने उपोषण,मोर्चेही काढावे लागले होते.तेंव्हा निलंगा शहरात २०१९ला बाबासाहेबांचा पूर्णाकृती उभा राहिला.
याच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी जुन्या टाऊन हॉल च्या जागेवर नगरपरिषेदे मार्फत एक नवीन मोठी वास्तू उभा करण्यात येत असून या वास्तूचे काम अंतिम टप्प्यात आले असून निर्माण करण्यात आलेल्या या वास्तुस महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी आता जोर धरीत आहे.
तमाम भारतीयांसाठी वैभवशाली असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तात्काळ नव्या वास्तुस देण्यात यावी यासाठी नगर परिषद सभागृहात निवडून आलेल्या बौद्ध बांधवानी याकामी आवाज उठवावा अशीही मागणी करण्यात आली आहे.बाबासाहेबांचे नाव हे शोषित, वंचित, पीडित माणसाचे ऊर्जाकेंद्र आणि प्रेरणास्थानही आहे. बाबासाहेबांचे नाव बौद्धांची अस्मिता असून देशाचे आणि विश्वाचे ज्ञानकेंद्रदेखील आहे. आज संपूर्ण जग बाबासाहेबांना ज्ञानाचे प्रतिक मानत आहे.
देण्यात आलेल्या निवेदनावर वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे ,माजी नगरसेवक विजयकुमार सूर्यवंशी,युवराज जोगी,प्रदीप सोनकांबळे, देवदत्त सूर्यवंशी,बालाजी कांबळे,गायकवाड अंकुश,अरविंद कदम यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निलंगा:मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment