पोळा सणावार कोरोनासह दुष्काळाचे सावट..
पोळा सणावर कोरोनासह दुष्काळाचे सावट : बैल धुवण्यासाठी हौदातील पाण्याचा वापर...
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : बळीराजाच्या दृष्टीने महत्त्वाचा सण असलेल्या बैल पोळा या सणावर कोरोनासह दुष्काळाचे सावट पसरले आहे. नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने पशुधन धुवायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यातील अडीच महिने कोरडेठाक गेले.
अशा संकटकालीन परिस्थितीत पोळा हा सण येऊन ठेपला आहे. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या पशूधनाच्या कष्टातून उतराई होण्यासाठी बैलांची सजावट करुन मनोभावे पूजा केली जाते. परंतु, यावर्षी कोरोनासह दुष्काळामुळे हा सण उत्साहात साजरा करणे कठीण जात आहे.
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना नदी नाल्यावर नेऊन स्रान घातले जाते. नंतर तुप, हळद लोण्याने खांदेमळणी केली जाते. यावर्षी मोठा पाउसच नसल्याने जलसाठे आटले आहेत. पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाहीत बैल धुण्यासाठी विहीरीवरील जनावरासाठी प्यायला ठेवलेल्या हौदातील पाण्याचा उपयोग बैलांना धुण्यासाठी करावा लागत आहे.
पोळा सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत दरवर्षी शेतकऱ्यांची खरेदीसाठी गर्दी होते. परंतु, यावर्षी बाजारपेठेत शेतकऱ्यांची संख्या अल्पशी होती. झुल, कासरे, सुत, घंटा, गोंडे, वेसण, मोरक्या आदी साहित्य पोळ्यापूर्वी विक्रीला येते. परंतु, खरेदीसाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
पोळ्याच्या सणावर कोरोनासह दुष्काळाचे सावट असल्याने शेतकऱ्यांत अनुत्साह आहे. दरवर्षी पोळ्याला बैलांसाठी सजावटीचे साहित्य खरेदी केले जाते. परंतु, यावर्षी मोठा पाऊस झाला नसल्याने पिके जेमतेम आहेत.पोळ्याच्या सणाला मुगाचे पिक शेतकऱ्यांच्या हातात येते. परंतु, यावर्षी कुठलेही धान्य हाती आले नाही.
Comments
Post a Comment