माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच निधन
जेष्ठ नेते डॉ .शिवाजीराव निलंगेकर यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप
निलंगा / प्रतिनिधी : स्वातंत्र्य सेनांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते,माजी मुख्यमंत्री,काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष मराठवाड्याचे थोर सुपूत्र डाॕ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पार्थिव देहावर शेकडोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला.
मराठवाड्यासह अख्खा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.असून डाॕ.निलंगेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील रुबी हाॕस्पीटलमध्ये उपचार चालू होते.दरम्यान २ आॕगस्ट रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनी कोरोनावर मात केली होती.दरम्यान मूत्रपिंड निकामी झाल्याने मंगळवारी पहाटे २.१५ वा. त्यांची प्राणज्योत मालवली.
९ फेब्रुवारी १९३१ रोजी तालुक्यातील नणंद येथे मामाच्या गावी त्यांचा जन्म झाला होता.अवघ्या सहा महिन्याचे असताना त्यांचे पितृछत्र हरवले.त्यांच्या मातोश्री वत्सलाबाईंनी मोठ्या धैर्याने व हिमतीने डाॕ.निलंगेकर यांचे संगोपन करुन त्यांना घडविले.गुलबर्गा येथे माध्यमिक, हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठात उच्च शिक्षण तर नागपूर विद्यापीठात त्यांनी पीएचडी मिळवली. १९५१ मध्ये धानोरा येथील सधन शेतकरी आप्पाराव धानूरे यांच्या कन्या सुशीलाताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.त्यांना चार मुले व एक मुलगी, जावई,सूना,नातू-पणतू असा मोठा परिवार आहे.
१९५५ पासून निलंगा येथे त्यांनी वकीलीस सुरुवात केली होती.१९६२ पासून ते राजकारणात पूर्णवेळ सक्रीय झाले.१९६२ पासून २०१४ पर्यंत ते या मतदारसंघातून तब्बल १० वेळा निवडून आले आहेत.या ५०-५५ वर्षाच्या थक्क करुन टाकणा-या या प्रदीर्घ कारकीर्दीत या लोकनेत्याने राज्यमंत्री,कॕबिनेट मंत्री,प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री या विविध पदांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याचा अक्षरशः कायापालट घडवून आणला.
महसूल,पाटबंधारे,आरोग्य, सार्वजनिक बांधकाम व पशूसंवर्धन आदी खात्यांची धूरा त्यांनी यशस्वीपणे पार पाडून मराठवाड्याचा कायापालट केला.मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द विशेष ठरली.
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी असलेले डाॕ.निलंगेकर राज्याच्या राजकीय पटलावर मितभाषी,शांत, सुस्वभावी व निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळखले जात.चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्या दादासाहेबांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरुन न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
तर मराठवाडा पोरका झाला आहे.दादासाहेबांच्या जाण्याने लातूर जिल्हा शोकसागरात बुडाला असून राजकारणातील एक राजकीय संत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.
त्यांच्या पार्थिवावर स्वतःच्या शेतात सायंकाळी साडेसहा वाजता शासकीय इतमामात २१ तोफांची सलामी देण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी जी श्रीकांत,पोलीस अधीक्षक डॉ राजेंद्र माने,उपविभागीय अधिकारी विकास माने,डी वाय एस पी निलेश देशमुख, तहसीलदार गणेश जाधव, उस्मानाबादचे खा.ओमराजे निंबाळकर,माजी खा.डॉ सुनील गायकवाड,विविध पक्ष संघटना चे पदाधिकारी सामान्य जनता उपस्थित होते.त्यांच्या कुटुंबातील त्यांचे सुपुत्र विजयकुमार पाटील-निलंगेकर यांनी भडाग्नी दिला.यावेळी त्यांच्या पत्नी सुशिलाबाई निलंगेकर, मुले शरद,अशोक,चार सुना, नातू माजीमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर,अरविंद पाटील, नातवंडे - पतवंडे यांच्यासह शिवाजीराव पाटील यांच्यावर प्रेम करणारे अनेकजण उपस्थित होते.
Comments
Post a Comment