मेजर अतुल पाटील याचा सत्कार
मेजर अतुल पाटील यांचा भव्य सत्कार आणि प्रकट मुलाखत
निलंगा,दि,20 प्रवीण कांबळे
मेजर अतुल बालाजीराव पाटील यांची भारतीय सैन्यदलात अल्पावधीतच सैन्यदलातील मेजरपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार आणि प्रकट मुलाखतीचे आयोजन निलंगा नगरीत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे युवा नेता अरविंद पाटील निलंगेकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी विकास माने साहेब, पी.आय. अनिल चोरमलेसाहेब, बिडिओ अमोल ताकभाते, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, मैत्री इन्स्टिट्यूटचे धनंजय गायकवाड, मेजर अतुल पाटील यांना घडवण्यात मोलाचा वाटा असलेले आजोबा गुलाबराव मुळे, मामा शिवप्रसाद मुळे, गुरुवर्य विजयकुमार सगरे, संजय कदम नुकतेच डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्त झालेले प्रमोद कुदळे यांची या कार्यक्रमात उपस्थित होती.
निलंगा नगरीतील विविध क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या अनेक व्यक्ती व संघटनांनी मेजर अतुल पाटील यांचा भव्य सत्कार केला. अमर पाटील यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीशैल्य बिराजदार यांनी केले. प्रल्हाद बाहेती यांनी शुभेच्छा देताना देशातल्या सैनिकांना सन्मान मिळाला पाहिजे. त्यांचे आयुष्य सुख समृद्धीने भरलेले असावे अशा भावना व्यक्त केल्या. एम. एम. जाधव यांनी गुलाबराव मुळे परिवाराचा आधार व मार्गदर्शनामुळे मेजर अतुल पाटील यांची जडणघडण झाल्याचे सांगितले. धनंजय गायकवाड यांनी शिक्षण आणि जीवनात धक्का देणारी माणसे जास्त मोलाची असतात. ती माणसे खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होण्यासाठी ऊर्जा देत असतात, अशी भावना या प्रसंगी व्यक्त केली. विकास माने यांनी अशा पद्धतीचे सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकीचे कार्यक्रम निलंगा नगरीत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मेजर आतुल पाटील यांच्या पदोन्नती बद्दल एवढ्या लहान वयात हे पद मिळाल्याचे विशेष कौतुक त्यांनी केले. अरविंद पाटील निलंगेकर यांनी आयुष्यात सतत नवीन काहीतरी शिकत राहावे लागते. मीही आयुष्यभर शिकत राहणारा विद्यार्थीच आहे. मेजर अतुल पाटील यांना या उंचीपर्यंत नेण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष हातभार लावला त्यात विशेषतः गुलाबराव मुळे परिवाराचे या कार्यात खूप मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. मेजर अतुल पाटील यांनी हे एवढे मोठे यश लहान वयात मिळवले ते स्वकर्तृत्वाच्या बळावर याचे त्यांनी विशेष कौतुक केले. निलंगा नगरीत निर्माण झालेले अनेक प्रश्न काही काळात सोडवले जातील असा शब्दही त्यांनी दिला. मेजर अतुल पाटील यांचा हा यशाचा जीवन प्रवास असाच जनरल पदापर्यंत जावो आणि निलंगा नगरीचा गौरव देशभर वाढत जावो, अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या. त्यानंतर सतीश हानेगावे यांनी अत्यंत परिणामकारक व प्रभावी अशा भाषाशैलीत उमरगा तालुक्यातील वागदरी या खेड्यातील शिक्षणासाठी झपाटलेल्या, मेजर अतुल पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. मेजर अतुल पाटील यांनी आपल्या शैक्षणिक जडणघडणीचा इतिहास मांडताना महाराष्ट्र विद्यालय निलंगा, सावरी, सैनिक स्कूल सातारा येथील भरभरून आठवणी जागवल्या. तेथील गंमतीजमती, चढ-उतार, भारावून टाकणारे मंतरलेले दिवस या साऱ्या भरभरून आठवणी त्यांनी व्यक्त केल्या. वेस्ट बंगालचे घोसालेसर यांनी दिलेली शाबासकीची थाप यामुळे सारे आयुष्यच कसे बदलले हे त्यांनी सांगितले. ज्यांच्यामुळे मी घडलो त्यात आई-वडील, विशेषतः आजोबा गुलाबराव मुळे, मामा शिवप्रसाद मुळे, शिक्षक विजयकुमार सगरे, संजय कदम यांच्यामुळे माझा जीवन प्रवास यशस्वी झाला अशी भरभरून कृतज्ञता त्यांनी अत्यंत भावूक शब्दांमध्ये व्यक्त केली. मी प्रथमतः मातृभूमीवर प्रेम करणारा एक निष्ठावान सैनिक आहे. स्वतःपेक्षा, कुटुंबापेक्षा आम्हा सैनिकांना नाम, नमक, निशाण हे प्राणाहून प्रिय असते. यामुळे आम्हाला युद्धात मृत्यूची भीती वाटत नाही. चीन आणि भारताच्या परिस्थिती बद्दल आपण निश्चिंत असावे, निर्भय असावे असा संकेत त्यांनी दिला. भारतीय सैन्यदलातील प्रत्येक सैनिक कसल्याही प्रतिकूल परिस्थितीत तग धरून, विजय प्राप्त करू शकतो, अशी अचाट क्षमता प्रत्येक सैनिकात असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. त्याची अनेक उदाहरणे त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात अत्यंत समाधानी असून, या क्षेत्रात खूप काही करण्याची माझी इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उपस्थित नागरिकांना संदेश देताना ते म्हणाले की, आपण व्यापार, उद्योग, शेती यात खूप गूंतवणूक करतो पण आपल्या मुलांमध्ये व शिक्षणामध्ये आपण ही आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे. समृद्ध विचारातूनच नवीन समृद्ध विचाराची सशक्त पिढी जन्माला येऊ शकते. अशा सशक्त विचाराच्या नवी पिढीवरच खऱ्या अर्थाने व्यक्ति, कुटुंब, समाज व राष्ट्राचे भवितव्य अवलंबून असते. यासाठी सतत नागरिकांनी जागृत राहून आपले जीवन कार्य करीत राहिले पाहिजे, अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला. शिवप्रसाद मित्र-मंडळींच्या वतीने हॉटेल राजवाडा याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निलंगा नगरीतील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग या कार्यक्रमांमध्ये होता.
Comments
Post a Comment