माता रमाईने अनेक मरण पाहिल्यामुळे आम्हास जीवन मिळाले- विलास सूर्यवंशी
माता रमाईने अनेक मरण पाहिल्यामुळे आम्हास जीवन मिळाले - विलास सूर्यवंशी
निलंगा,दि.०७
भारत देशातील बहुजन समाजाला येथील व्यवस्थेने वर्षानुवर्षे गुलामीच्या साखळ दंडात अडकवून ठेवले होते. या समाजाला मुक्त करण्यासाठी महामाता रमाईने जिवंत असतांना अनेक मरण पाहिल्याने आज बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन प्राप्त झाले आहे असे मत रिपाई (डे)चे प्रदेश सचिव विलासजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क निलंगा येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. तत्पुर्वी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिपाने,धुपाने,पुष्पाने पूजन करण्यात आले.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाअध्यक्ष प्रा.रोहित बनसोडे,जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे, लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष गोविंद सुरवसे,गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे,भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष दिगंबर सूर्यवंशी
(नणंदकर),महाराष्ट्र विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष देवदत्त सूर्यवंशी,वाहेद कुरेशी,वंचितचे युवा नेते प्रदीप सोनकांबळे,पत्रकार मिलिंद कांबळे,नागेश सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सूर्यवंशी पुढे म्हणाले की, माता रमाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता.
त्यांचे वडील भिकू धोत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाई दाभोळ जवळील वनंदगावात राहत असत रमा लहान असताना आईचे निधन झाल्याने रमाईच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला.
काहीदिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. त्यामुळे वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा हे रमाईस व रमाईच्या भावंडांसह मुंबई येथे राहण्यास आले.दरम्यानच्या काळात बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील पिता सुभेदार रामजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विवाहासाठी मुलगी पाहत असताना सुभेदार रामजी बाबास रमाई पसंद पडली व माता रमाई यांचा वयाच्या ०९ व्या वर्षी १९०६ साली बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विवाह संपन्न झाला.
येथून जीवनाचा संघर्ष सुरू झाला रमाई मातेस जीवनात फार दुःख सहन करावे लागले. १९२३ साली बाबासाहेब लंडनला शिक्षणासाठी गेले,त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत.त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने अडचणींशी सामना करत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान माता रमाईच्या अंगी होते.
या काळात त्यागमुर्ती माता रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात, आई वडिलांचा मृत्यू १९१३ साली, रामजी सुभेदारांचा मृत्यू १९१४ ते १९१७ साली, बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू, ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू, १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व १९२६ मध्ये राजरत्नचा मृत्यू पाहिला.
बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना या घटना त्यांनी कळविल्या नाहीत. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही.पती परदेशात शिक्षणासाठी गेले.
रमाई एकट्या पडल्या. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्या वेचल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत. बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८ नंतर गोवर्या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.
अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्यास करु लागले. त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.
ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.अश्या त्यागी माता रमाई होत्या असेही ते यावेळी म्हणाले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.रोहित बनसोडे ,प्रदीप सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले.
निलंगा, मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment