पत्रकारांनी मालकशाहीचा उदो-उदो करण्यापेक्षा लोकशाही वाचविण्यासाठी लेखणी धारदार करावी - विलास सूर्यवंशी
पत्रकारांनी मालकशाहीचा उदो-उदो करण्यापेक्षा लोकशाही वाचविण्यासाठी लेखणी धारदार करावी..
-विलास सूर्यवंशी
निलंगा,दि.०४(प्रतिनिधी)
पत्रकारांनी केवळ मालकशाहीचा उदो-उदो करण्यापेक्षा लोकशाही वाचविण्यासाठी आपली लेखणी धारदार करावी असे मत रिपाई(डे) चे प्रदेश सचिव विलास सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
ते येथील शासकीय विश्रामगृहात दै.रत्नापुर समाचारच्या दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे अजित माने होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधिज्ञ भाई नारायणराव सोमवंशी,रिपाई (आ) चे अंकुश ढेरे,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ सगरे होते.
यावेळी बोलतांना सूर्यवंशी पुढे म्हणाले की,देशाला स्वातंत्र्य मिळण्यात पत्रकारांचा फार मोठा सहभाग होता.आजच्या पत्रकारीतेत भाटगिरीचे प्रमाण अधिक वाढले आहे.आणि हेच लोकशाहीस घातक ठरत आहे. पूर्वी सारखी निस्वार्थी पत्रकारिता आता अभावानेच पहायला मिळते.पूर्वीचे पत्रकार हे खरी बातमी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रम घेत असत.मात्र आजचे अनेक पत्रकार हे केवळ मालकशाहीचे हित जोपासण्यात मग्न असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास आता मिळत आहे.
इथेच पत्रकारितेच्या मूल्यांना ईजा होण्यास सुरुवात झाली आहे.वंचिताना न्याय मिळणे हा लोकशाहीचा प्राण आहे, श्वास आहे .हिच लोकशाहिची खरी व्याख्या आहे. या देशात सत्य काय आहे हे सांगणारी पत्रकारिता जगली पाहिजे,जिवंत राहिली पाहिजे.तरच लोकशाही जगेल आणि देश वाचेल. पत्रकारांनी लोकशाही टिकविण्यासाठी आणि वाचविण्यासाठी लेखनी धारदार केली पाहिजे.लोकशाही जर देशात राहिली नाही तर सर्व समान्यांचा आवाज असलेली पत्रकारिता शिल्लक कशी राहणार ? असा प्रश्न सूर्यवंशी यांनी उपस्थित केला.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे,अंगद जाधव,सुरेश रोळे, यांच्यासह येथील जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर, विशाल हलकीकर,मिलिंद कांबळे, बालाजी कांबळे, साजिद पटेल, सुरेश माने,नयूम खतीब,अक्रम देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment