स्त्रियांच्या प्रश्नावर बोलू काही...

स्त्रियांच्या प्रश्नावर बोलू काही

जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम क्लारा झेटकिन या कार्यकर्तीला मानाचा सलाम करून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. 8 मार्च रोजी दरवर्षी मोठ्या उत्साहात आपण महिला दिन साजरा करतो. आपल्या आयुष्यात भेटलेल्या सर्व महिलांना आपण शुभेच्छा देतो. कर्तृत्ववान महिलां विषयी आदर व्यक्त करतो. या दिवसाचा मुख्य हेतु म्हणजे महिलांना त्यांच्या हक्क व अधिकाराविषयी जाणीव करून देणे, यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.विविध पुरस्काराने महिलांना सन्मानित केले जाते. पण खरच वर्षातील 8 मार्च हा दिवस सोडला तर बाकीचे 364 दिवस आपण त्याच पद्धतीने महिलांसोबत आदराने वागतो का? आपल्यातील 90% महिलांना तर आजचा दिवस काय असतो याची जराशी ही खबर  नसते.अशा महिलांना या दिवशी त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली तर या दिवसाचे उद्दिष्ट साध्य होईल नाहीतर महिला दिवस हा कार्यक्रमा पुरताच  मर्यादित राहील.
महिला पुरस्काराच्या विविध बातम्या प्रसारित होताना आपण पाहतो. मोठमोठे बॅनर जाहिराती पोस्टर्स इत्यादीवर बराचसा खर्च झालेला  दिसतो. हे सर्व पाहून त्या दिवसापुरता आनंद तरी होतो पण त्यानंतरच्या 364 दिवसाचं काय? हा प्रश्न भयानक रूप धारण करताना दिसतो. आजची महिला जेव्हा कामानिमित्त घरातून बाहेर पडते तेव्हा ती सुरक्षित आहे का?आज सुद्धा जेव्हा  ती  कामावरून उशिरा घरी येते तेव्हा तिच्या मनात एक प्रकारची भीती असते. असे का?
कोविड -19  मुळे रस्त्यावर जागोजागी मास्क लावला नाही म्हणून दंड लावणारे कर्मचारी आपल्याला दिसतात, पण आजची महिला कामावरून उशिरा घरी येताना ती सुरक्षित घरी यावी म्हणून कुणीही तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर कुठेही थांबलेला दिसत नाही.उलट सगळेजण तिची छेड काढण्यासाठी टपलेले असतात. कोविड -19 मुळे झालेले मृत्यू तुम्हाला दिसतात, पण अन्याय,अत्याचार, ॲसिड हल्ला, बलात्कारामुळे आपले जीवन संपवणाऱ्या स्त्रियांचे मृत्यू तुम्हाला दिसत नाहीत का? कोविड -19 चा व्हायरस तुम्हाला दिसतो, पण अन्याय, अत्याचार करणारे व्हायरस तुमच्या समोरून बिनधास्त फिरताना दिसतात. त्यांच्यावर कोणती व्हॅक्सीन कोण आणि कधी शोध लावून कंपल्सरी देण्याची व्यवस्था करणार आहे,याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत आणि तेव्हा कुठे या 8 मार्च महिला दिनाच्या गौरवाचा खरा आनंद मिळेल हाच मोठा पुरस्कार महिलांसाठी असेल.
खरे तर व्हॅक्सिन हवंच कशाला? मानसिकता बदलण्यासाठी काय व्हॅक्सीन लागतो होय. महिलांना महिला दिना दिवशीच आदराने  वागणूक देण्यापेक्षा 365 दिवस ही तिच्याशी आदराने वागले तर व्हॅक्सीन ची गरजच काय? मुलीचा जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत ती संघर्षमय जीवन जगून कितीतरी नाते निभावते. प्रत्येक टप्प्यावर ती आपले कर्तत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याला अनेक कर्तुत्ववान स्त्रियांचा इतिहास माहित आहे.चूल आणि मूल सांभाळून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या स्त्रिया आपण पाहतो. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेली दिसून येते. ती कुठेही मागे नाही,पण ती अजूनही सुरक्षित नाही. हाच खूप गंभीर प्रश्न आहे.
स्त्री शक्तीला व स्त्रियांना समजून घेत असताना भारतीय परंपरेत स्त्री व पुरुष यांना एकच दर्जा दिलेला दिसतो.म्हणजेच दिव्यात तेल आहे पण वात नाही किंवा वात आहे पण तेल नाही, म्हणजेच पडणाऱ्या प्रकाशात तेल आणि वात दोन्हीचा दर्जा एकच आहे. म्हणून म्हणते जागतिक महिला दिनाचे खरे सार्थक तेव्हाच होईल,जेव्हा प्रत्येक पुरुष स्त्री चे महत्व ओळखून तिचा अधिकार मनापासून स्वीकारेल.तेव्हा कुठे स्त्रीला सुरक्षिततेची दिशा मिळेल.
क्लारा ने 8 मार्च 1908 साली वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या स्त्रियांना घेऊन न्यूयॉर्कमध्ये निदर्शने केली होती, तेव्हा ही  क्लारा ने  कामाचे तास कमी आणि "महिला सुरक्षितता," पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही मतदानाचा हक्क,मालमत्ता इत्यादी बाबींची मागणी केली होती.त्या दिवसाला स्मरून तिने 8  मार्च हा दिवस "जागतिक महिला दिवस" म्हणून साजरा करावा, अशी ही मागणी केली होती आणि ती मान्यही झाली. आपल्याला आजपर्यंत क्लारा च्या इतर मागण्या मान्य झालेल्या दिसून येतात. पण आजही "महिला सुरक्षितता "ही मागणी अपूर्ण असल्याचे चित्र दिसून येते या मागणीची पूर्तता जेंव्हा होईल, तेव्हाच महिला दिनाचे सार्थक होईल, असे वाटते. आजही महिला दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आतापर्यंत यशस्वी झालेला नाही, कारण समाजाची मानसिकता आजही बदललेली दिसून येत नाही. 8 मार्च हा दिवस जसा आपण आनंदाने साजरा करतो तोच आनंद 364 दिवस सर्व स्त्रियांना मिळो. अशी अपेक्षा  व्यक्त करून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते.
धन्यवाद.
सहशिक्षिका,नंदा सोनकांबळे
जि.प.प्रा.शा.वाकसा 
ता.निलंगा जिल्हा लातूर

Comments

  1. जयभीम मॅडम
    महिला दिनाच्या निमित्ताने आपण खुप मार्मिक, स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले आहे. आजही स्त्रियांच्या सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर आहेत. स्त्रीया चौफेर आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत पण भारतीय पुरुषांची मानसिकता हवी तितकी अजून बदलली नाही.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबिल व संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना समान संधी व अधिकार मिळवून दिले आहेत. आता भारतीय समाजाने पुढे येवून त्या अधिकाराची अडवून करणे थांबवले पाहिजे.
    स्त्रियांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी सर्वांनी, आपणही पुढे येवून कार्य करणे आवश्यक आहे.
    आपणास व आपल्या कार्य कर्तृत्वास प्रणाम व जागतिक महिला दिनानिमित्त खुप खुप शुभेच्छा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..