निलंग्यात एस टी कर्मचाऱ्यांचा संप...
निलंग्यात एस टी कर्मचाऱ्यांचा संप...
विद्यार्थ्यांचे वेळापत्रक कोलमडले... प्रवाश्यांचे हाल..
निलंगा,दि.३(मिलिंद कांबळे)
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे. यामुळे राज्यभरातील बस सेवा विस्कळीत झाली आहे.
संपामुळे एसटी बसेस सोडल्या जात नाहीत त्यामुळे प्रवाशी जनतेचे ,विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणत हाल होत आहेत.एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत त्यात प्रामुख्याने एस टी चे खाजगीकरण बंद करा. सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करा.
तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी.
चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचा-यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या. इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा. सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा. वेळापत्रकातील त्रुटी दूर करा. जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा. विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या.
या सर्व मागण्या आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मंजूर कराव्यात, असे आवाहन एसटी कर्मचारी कृती समितीकडून करण्यात आले आहे.मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही मागण्या मान्य न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
सरकारसोबत चर्चेसाठी केव्हाही तयार आहे. मात्र प्रत्येकवेळी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात.आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अजून तीव्र आंदोलन करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे...
Comments
Post a Comment