मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील काम निकृष्ट.. निलंगा तालुक्यातील प्रकार उघडकीस..
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम निकृष्ट...
मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता उखडला जुना पुलही खचला...
निलंगा तालुक्यातील इनामवाडी - गुऱ्हाळ - सावनगिरा - बोटकुळ- होसुर - चिचोंडी मार्गावरील प्रकार उघडकीस...
निलंगा,दि.२३ 
(मिलिंद कांबळे)
ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास साधता यावा म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली. पण अधिकाऱ्यांनी या योजनेची पूर्णतः वाट लावली आहे.एक वर्षापूर्वी झालेल्या या रस्त्या कामाचा फज्जा उडाला असून इनामवाडी - गुऱ्हाळ - सावनगिरा - बोटकुळ - होसूर - चिचोंडी हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला असून गुऱ्हाळ - सावनगिरा रस्त्याच्या मध्यभागी असलेला जुना जीर्ण झालेला पुल अर्ध्यापेक्षा ज्यास्त प्रमाणात खचलेला आहे.
या पुलावरून दररोज एस टी बसेस ,चारचाकी, दुचाकी वाहनाने प्रवाशी प्रवास करीत असतात तर याच मार्गावरून ग्रामीण भागातील शाळा कॉलेजसाठी येणारे विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असतात.सध्या पावसाळयाचे दिवस आहेत जर एखादा मोठा पाऊस झाला तर या मार्गावर या जीर्ण झालेल्या पुलावर एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
असे असताना सदरील कॉन्ट्रॅक्टरने सर्वात आगोदर या पुलाचे काम करणे गरजेचे असताना घाई - घाई करून रस्ता डांबरीकरण काम पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे.हे कॉन्ट्रॅक्टर निलंगा येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे नातलग असल्याचे सांगतात व काम निकृष्ट दर्जाचे करतात असे या मार्गावरील अनेक गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. व अशी चर्चा प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणातून चर्चिली जात आहे.
या रस्त्याची दर्जोन्नती करण्या करिता १३ कि.मी ४३५ मिटर लांबीच्या रस्ता कामासाठी अंदाजित किंमत ०६ कोटी ९३ लाख ७६ हजार रक्कमेचा रस्ता मंजूर झाला असून या कामाची सुरुवात २६ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेली आहे. सदरील कामाचे कॉन्ट्रॅक्टरदार श्री नरेंद्र रामराव काळे रा. लातूर हे असून या कामाची कार्यान्वित यंत्रणा ही कार्यकारी अभियंता प्र. ग्रा.स.योजना महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था ही असून डांबरीकरण झालेला हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून इनामवाडी गावात हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.याशिवाय या मार्गावर अनेक ठिकाणी हा रस्ता खचलेला उखडलेले आहे.
जर अश्याच प्रकारे ग्रामीण भागातील रस्तेच सुधारत नसतील तर या रस्त्याची योजना पांढरा हत्तीच खावून जात आहेत असे म्हटले तर ते चुकीचे वाटू नये. कोट्यवधी रुपये खर्च करूनही सामान्य जनतेला चांगल्या प्रवासाला मुकावे लागत असल्याचे दिसून येत आहे. निलंगा तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अनेक गाव मार्गावर अनेक कामे सुरू आहेत.
पण ती अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने रस्त्याची निर्मिती होणार की नाही, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्ते कामाचे अंदाजपत्रक तयार करताना कार्यकारी अभियंत्यांनी भरपूर तरतूद केल्याचे समजत असले तरी प्रत्यक्षात काम अंदाजपत्रकाच्या नियमाप्रमाणे होत नसल्याचेच दिसून येत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागात असलेले अधिक लांबीच्या रस्त्यांचा समावेश करण्यता आला आहे. यासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष करण्यात आलेली कामे, यात कुठेही हिशोब जुळत नसल्याचेच दिसून येत आहे. दोन्ही बाजूला खोदलेल्या नाल्या व साईड पट्याचे काम कमी व निकृष्ट होत असल्याचे दिसत आहे. रस्ता काम करताना मुरूम अस्तरीकरणाचा कोट थातुरमातुर करून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकदा सुरू झालेल्या कामाला गती देत ते पूर्ण करण्याचे सोडून आर्थिक जुळवाजुळव करण्यासह स्व-हित जोपासण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचेच दिसून व जनतेतून मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता या सर्व साखळीने कंत्राटदारांशी हातमिळवणी करून सुमार दर्जाची कामे करण्यावर भर दिल्याचेच दिसून येत आहे.व जनतेत मोठ्या प्रमाणत बोलले जात आहे. अंदाजपत्रकात असलेल्या साहित्याचा दर्जा कुठेही आढळत नाही. ४० एमएम, ८० एमएम कोड करताना निव्वळ मुरूम अधिक टाकला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून येत आहे. कामे निकृष्ट करून या योजनेच्या मूळ उद्देशाला बगल दिली जात असल्याचेच दिसते. जिल्ह्यात सर्वत्र कामे सुरू असली तरी त्या कामांना गती अद्यापही प्राप्त झालेली नाही. शिवाय आर्थिक हित जोपासण्याच्या प्रयत्नात रस्त्यांची कामे अत्यंत ढिसाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर अल्पावधीतच अवकळा येते. काही महिन्यांपासून कामे सुरू असलेले रस्ते ‘पुढे पाठ, मागे सपाट’, या पद्धतीने होत असल्याचेच पाहावयास मिळत आहे. काही कंत्राटदार कामांचा दर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असले तरी अभियंत्यांच्या कमिशनबाजीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, रस्त्यांचा दर्जा टिकविणे शक्य होत नसल्याचे कंत्राटदार खासगीत बोलून दाखवितात.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत होत असलेल्या या गैरप्रकाराकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याचेच दिसून येत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचे झाले आहे...
Comments
Post a Comment