निलंग्यात पेट्रोल पंपावर ग्राहकाची लूट...
निलंग्यात पेट्रोल पंपावर ग्राहकाची लूट...
निलंगा येथील गजानन (लांबोटकर) पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची धम्मानंद काळे यांची मागणी...
निलंगा,दि.७ (मिलिंद कांबळे)
निलंगा शहरातील काही पेट्रोल आणि डिझेल पंपावर ग्राहकांची लूट होत आहे. मिटरकडे लक्ष नसताना इंधन टाकणाऱ्या नोझलमध्ये हातचलाखी करून ‘मापात पाप’ केले जात आहे. ‘०’ रिंडिग न करताचा बाइकमध्ये पेट्रोल सोडले जाते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे यांनी उपनियंत्रक वैद्य मापन शास्त्र लातूर धाराशिव जिल्हा लातूर यांच्याकडे तक्रार दाखल केली असून निलंगा येथील गजानन एजन्सी (लांबोटकर) पंपाची मान्यता रद्द करण्याची मागणी लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
____________________
दिलेल्या तक्रारीत पुढे असे नमूद करण्यात आले आहे. की, दि.०६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०२:३० वाजेच्या सुमारास धम्मानंद काळे यांचा मुलगा आर्या धम्मानंद काळे याने त्यांच्या मोटासायकल मध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेला.तेथे त्याने दुपारी ०२:३० वाजता ७५ रुपयाचे गाडीत पेट्रोल भरले व पेट्रोलची रक्कम फोन पे द्वारा देऊन तो घरी आला.
____________________
परंतु पेट्रोल कमी भरल्याचे भासल्यामुळे ७५ रुपयांचे पेट्रोल गाडीतून प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये काढले व पुन्हा त्याच पेट्रोल पंपावर ५० रुपयांचे पेट्रोल भरले व खात्री करण्यासाठी पुन्हा तो त्याच पंपावर ५० रुपयांचे पेट्रोल प्लास्टिक बाटलीत काढले. या भरलेल्या दोन्ही पेट्रोल मध्ये तफावत जाणवु लागल्याने खात्री करण्यासाठी उपस्थित ग्राहक व तेथील कर्मचाऱ्यांना बोलावून सदरील प्रकाराबाबत माहिती दिली.
__________________
या प्रकाराबाबत तेथे उपस्थित असलेल्या अनेक ग्राहकाने घडलेला प्रकार चुकीचा असून सदरील प्रकार अनेक ग्राहका सोबत घडत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी ग्राहकांनी सांगितले
___________________
अत्यंत विश्वासाने या पेट्रोल पंपात पेट्रोल टाकण्यासाठी आम्ही येत आहोत.आमच्या सारखे हजारो ग्राहक दररोज येत असतात परंतु असा प्रकार जर घडत असेल तर संबंधित पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी उपस्थित असलेल्या अनेक ग्राहकाने केली.
__________________
त्याच प्रमाणे सदरील पेट्रोल पंपावर कंपनीने दिलेल्या नियमाचे पालन होत नाही, ग्राहकाना मुलभुत सेवा देत नाहीत. याबाबत ही सदरील पेट्रोल पंपाच्या कारभाराची चौकशी करून परवाना रद्द करण्यात यावा असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
----------------------------
अशी होते ग्राहकाची लूट..
काही पेट्रोल पंपावर
मीटरकडे लक्ष नसताना इंधन टाकणाऱ्या नोझलमध्ये हातचलाखी करून ‘मापात पाप’ केले जात आहे. ‘०’ रिंडिग न करताचा बाईकमध्ये पेट्रोल सोडले जाते. असा अनुभव येत आहे. पेट्रोल पंपावरील ही लूट थांबविण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, पेट्रोलियम कंपन्याचे अधिकारी यांच्याकडून ‘ऑन दी स्पॉट’ कारवाईची गरज आहे. दरम्यान, पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र विभाग आणि पेट्रोलियम कंपन्यांकडून होणाऱ्या कारवाईवेळी खबऱ्यांकडून पंपमालकांना आधीच ‘टीप्स’ मिळतात.त्यामुळे अनेकदा कारवाई कागदावरच राहते.
_________________
फसवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या यंत्रणेचे ‘लिकिंग’ असल्याने ग्राहकांच्या लुटीला अधिक बळ मिळत आहे.
----------------------------
पेट्रोल पंपावर ग्राहकांना दुचाकी वाहनात पेट्रोल कमी सोडण्याच्या तक्रारींत सातत्याने वाढ झाली आहे. काही ठराविक पेट्रोल पंपावर ठराविक किंमतीचे पेट्रोल, नोझलमधील हातचलाखी, सुट्या पैशांचा वाद, ग्राहकांचे लक्ष नसताना मीटरची गती वाढविणे, स्टॅम्पिंगसाठी टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
________________
एकाद्या ग्राहकाने पन्नास रुपयांचे पेट्रोल घेतले आणि दुसऱ्या ग्राहकांना शंभर रुपयांचे पेट्रोल घेतले तर मीटर रिडिंग ‘झिरो’ केले जात नाही. शंभर रुपयांचे पेट्रोल घेतल्यास प्रत्येक पंपावर रिंडीग वेगवेगळे दाखविले जाते. पेट्रोल-डिझेलचा दर सातत्याने बदलतो.मात्र, अनेकदा दर कमी झाला असल्यास, दर बदलाच्या दुसऱ्या दिवशीही जुन्या दरानेच पेट्रोल-डिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा तक्रारींची पडताळणी करून वैधमापन शास्त्र विभागाने वितरकां- विरोधात खटले दाखल करण्याची गरज आहे.
___________________
गंभीर तक्रारी असल्यास पंप जप्त करण्याची कारवाईही करण्याची तरतूद आहे. मात्र तसे धाडस अधिकारी करीत नाहीत. महाराष्ट्र वैध मापनशास्त्र (अंमलबजावणी) नियम २०११ मधील तरतुदींनुसार पेट्रोलियम पदार्थांच्या अचूक वितरणाची खात्री करण्यासाठी प्रत्येक पंपावर पाच लीटर क्षमतेचे प्रमाणित माप ठेवणे बंधनकारक आहे.मात्र, काही पंपांवर प्रमाणित माप नाहीत.
त्याची तपासणीही पथकांकडून केली जात नाही.
_________________
पंपाची पुनर्पडताळणी व मुद्रांकन दर महिन्याला करणे गरजेचे आहे. तेही होत नसल्याची स्थिती आहे.
----------------------------
संयुक्त तपासणी नाहीच
उत्तरप्रदेशमधील काही पेट्रोल पंपावर काही वर्षापूर्वी चिप बसविल्याचे स्पष्ट झाले होते.त्यामुळे केंद्रीय पेट्रोलियम विभागाकडून राज्यातील सर्वच पंपाची तपासणीची मोहिम राबविली.वाहनांत पेट्रोल टाकणाऱ्या डिस्पेन्सरमध्ये चिप बसविली जाते. टाकीत पेट्रोल पडायचे बंद झाले तरी मीटर रिंडिग सुरूच राहते. ही चिप दिल्ली आणि कानपूरच्या बाजारात एक ते दोन हजार रुपयांना मिळत असल्याचेही तपासात पुढे आले होते.निलंगा येथेही काही पंपांवर इलेक्ट्रॉनिक चिप बसविल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी तपासणीची गरज आहे.
_________________
अशी होतेय फसवणूक
सातत्याने नोजल दाबणे पंपावरील कर्मचारी पेट्रोल भरण्याच्या पाईपजवळील नोजल सातत्याने दाबतात. एकदा स्विच ऑन केल्यानंतर नोजल सारखे दाबून कमी पेट्रोल टाकले जाते. नोजलचा संबंध मीटरशी आहे. पेट्रोल टाकताना नोजलचं स्वीच बंद केला, तरीही मीटर चालू राहते. मात्र पेट्रोल टाकीत पडत नाही. याचा फायदा काही पेट्रोल पंपावर कर्मचारी घेतात. पेट्रोल टाकताना मध्येच स्वीच बंद करतात. त्यामुळे पेट्रोल टाकीमध्ये हळूहळू जाते.दहा सेकंदासाठी जरी स्विच बंद केला तरी ५० रुपयांचे पेट्रोल कमी भरले जाते.
____________________
झिरो रिंडिग पाहा पेट्रोल भरण्यापूर्वी मीटरचं रिडिंग शून्य असल्याची खात्री करणे गरजेची आहे. पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास फिल्टर पेपर परीक्षणाची मागणी ग्राहक करू शकतात. भरलेल्या पेट्रोलच्या रक्कमेची पावती शिक्यानिशी दिली जात नाही.
__________________
चिपमधून चोरी..
पेट्रोलच्या मशीनमध्ये एक विशेष चीप बसविली जाते. या चीपला रिमोटने नियंत्रित केले जाते. पंपावरील कर्मचारी चिपला बटणाने नियंत्रित करतो.ग्राहक पेट्रोल भरताना बटण दाबल्यास पेट्रोल कमी पडते. मीटर सुरू असल्याचे ग्राहकांना स्पष्टपणे दिसते. तालुक्यातील काही पंपावर चिप वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
__________________
अशी होतेय फसवणूक
फिक्स किंमतीचे पेट्रोल नकोच अनेकदा सुट्या पैशाचा वाद नको म्हणून शंभर,दोनशे रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल टाकण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो.मात्र ठराविक किंमतीचे पेट्रोल भरल्याचा ग्राहकांना फटका बसू शकतो. काही पंपचालकातील कर्मचारी मशीनची छेडछाड करून वेग वाढवितात.त्यामुळे मीटर जम्प करते.ऑड नंबरचं पेट्रोल टाकल्यास म्यॅनुअली पेट्रोल टाकावे लागेल आणि मीटरही जम्प करणार नाही.
__________________
ग्राहक अगदी विश्वासाने पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी येत असतात.जर ग्राहकाची या माध्यमातून लूट होत असेल तर प्रशासनाने संबंधित पेट्रोल पंपावर कायदेशीर कारवाई करावी व ग्राहकाची लूट थांबवावी अन्यथा संभाजी सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल..
बबन राजे ,संभाजी सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष लातूर जिल्हा.
__________________
रात्रंदिवस कष्ट करून रक्ताचे पाणी - पाणी करून ज्या गावात काम चालू आहे तेथे वेळेत पोहचण्यासाठी मोटारसायकलचा वापर करीत आहे.माझ्यासोबत ही असे अनेकवेळा घडले आहे .मात्र कोठे तक्रार करावी माहिती नसल्याने गप्प बसावे लागले होते.
मात्र कालचा प्रकार माझ्यासमोर झाला आहे.अशी होत असलेली लूट थांबवावी..
जगन्नाथ बालाजी गायकवाड. मिस्त्री निलंगा
___________________
निलंगा शहरातील पेट्रोलपंपावर नागरिकांची लूट होत आहे असे ऐकण्यात आले, ही माहिती खरी असेल तर पेट्रोल पंप चालकांवर शासनाने प्रशासनाने कठोर कार्यवाही करणे गरजेचे आहे,शासनाने ठरवून दिलेल्या भावात पेट्रोल विक्री झाली पाहिजे - योग्य ते मोजमाप ठेऊन पेट्रोल डिझेल विक्री झाली पाहिजे यातून जर कोणी नागरिकांची लूट करण्याचा प्रयत्न करत असेल तर कठोर कार्यवाही झालीच पाहिजे.
विनोद सोनवणे - जिल्हा संघटक मराठा सेवा संघ लातूर.
___________________
सामान्य नागरिकांची होत असलेली ही फसवणूक गैर व्यवहार थांबविण्यासाठी प्रशासनाने पेट्रोल पंपाच्या मालकावर गुंन्हा नोंद करावा व सबंधित पेट्रोल पंपाच्या परवाना रद्द करण्यात यावा .
उध्दव दत्तात्रय मेकाले
रा. चांदोरीवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर..
____________________
अनेकदा शंभर रुपये दिले तरीही ९९ रुपयांचे पेट्रोल सोडले जाते. अनेक पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांत केवळ हवाच भरली जात असल्याचा अनुभव आहे. मात्र रिडिंग चोख दाखविले जाते.तक्रार केल्यास कंपनीचे विक्री प्रतिनिधी कधीही वेळेवर येत नाहीत. अनेक तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते.
संदीप धनराज बनसोडे
रा.हरिजवळगा तालुका. निलंगा जिल्हा लातूर ग्राहक...
__________________
पत्रकार मिलिंद कांबळे
निलंगा. जिल्हा लातूर
Comments
Post a Comment