निलंगा अग्निश्यामक दलात फायर बुलेट दाखल...
निलंगा अग्निशामक दलात
फायर बुलेट दाखल...
निलंगा,दि.११
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांना आग विझवण्यासाठी सुसज्ज यंत्रणा कार्यान्वित असलेली दुचाकी वाहने (बुलेट) पुरविण्यात येत असून त्यामध्ये वॉटर मिस्ट मोटर बाईक व कॉम्प्रेस्ड एअर फोम (CAF) बाईक अशा दोन प्रकारच्या दुचाकींचा समावेश आहे.
छोट्या स्वरुपात लागलेल्या आगीच्या ठिकाणी तातडीने वापरता येणारी प्रथम प्रतिसाद यंत्रणा म्हणून या दुचाकींचा अत्यंत प्रभावी वापर होणार असून तेल व गॅसमुळे लागलेली तसेच विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेली आगही या दुचाकीद्वारे विझवता येणार आहे.ज्या ठिकाणी फायर टेंडरच्या गाड्या पोहोचू शकणार नाहीत,अशा अरुंद गल्ली - बोळातील जागी तसेच झोपडपट्टीमध्येही या दुचाकी सहज पोहोचू शकतात व भडकणाऱ्या आगीवर ३ मीटर ते १२ मीटर अंतरावरुन तसेच ३० फूट उंचीपर्यंत Mist स्वरुपात फवारा मारु शकतात.
यामध्ये पाण्यासोबतच रासायनिक फोमचा वापर केल्यामुळे तात्काळ नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार आहे.अशा प्रकारची खास वैशिष्ट्ये असलेल्या दुचाकी वाहने राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत प्रथमच पुरवण्यात येत असून आगीमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपरिषदेस 1 फायर बुलेट बाईक (water mist Rapid Fire Fighting Bikes) राज्य शासनाकडून पुरविण्यात आले आहे, त्याचे दि.११ ऑक्टोबर२०२४ रोजी आमदार संभाजीराव पाटील - निलंगेकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यावेळी नगर पालिका अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
Comments
Post a Comment