निलंगा लय भारी दुय्यम निबंधक कार्यालयाचा पदभार प्रभारी....
दररोज लाखोंचा महसूल देणाऱ्या निलंगा दुय्यम निबंधक कार्यालयाचा पदभार लिपिकावर...
निलंगा,दि.०४
येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या एक महिन्यापासून कायम स्वरूपी पूर्ण वेळ निबंधक अधिकारी मिळत नसून, सध्या लिपीकावरच रोज लाखोंचा महसूल देणाऱ्या कार्यालयाचे काम भागविले जात आहे.
मात्र,काम करताना अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने नियमित, पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणी आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
येथील दुय्यम निबंधक अर्थात विविध शासकीय दस्तावेज नोंदणी कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. दस्तावेज नोंदणीसाठी शहाराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या संख्येनं वर्दळ असते. परंतु या कार्यालयात गेल्या एक महिन्यापासून दुय्यम निबंधक अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. जिल्ह्यातील सह-जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक या पदावर मूळ पदस्थापना असलेले गोविंद मारोती मचकटे यांच्यावरच निलंगा दुय्यम निबंधक पदावर नेमणूक करून काम भगविले जात आहे. तेही लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्याची अशा महत्त्वाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अर्थात या लिपिकास संबंधित अधिकाराच्या कामकाजाचे प्रशिक्षण या विभागकडून दिले गेले किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी एखाद्या क्लिष्ट प्रकरणांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत मागवित असतात , अशावेळी प्रचंड खोळंबा होत असतो. यामुळे नागरिकांना देखील नाहक वेळ वाया घालवावा लागत असतो. वास्तविक नागरिकांकडून विविध दस्तावेज नोंदणीसाठी मोठा महसूल पोटी वर्षाला लाखो कोटींची रक्कम केवळ निलंगा कार्यालयाकडून मिळत असल्याचे म्हटले जाते. त्यातही खरेदी खत, हक्कसोड पत्र,गहाण खत, बक्षीस पत्र, प्रत्यातरण पत्र, बिनाताबा सौदा पावती, दत्तक पत्र अशा नोंदनी तर रोजच केल्या जात असतात . साहजिकच या कार्यालयाला पूर्णवेळ दुय्यम निबंधक देणे अत्यंत गरजेचे असताना केवळ काम चलावू कर्मचारी देण्यात येत असल्याने जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने या प्रकरणी दखल घेवून कायम स्वरूपी अधिकारी नियुक्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा येथील सामाजिक संघटना व सुज्ञ नागरिकांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणी विविध पक्ष ,संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील साफ दुर्लक्ष केल्यामुळे सर्वत्र नाराजीचा सुर उमटत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालय भाड्याच्या इमारतीत..
येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार,कामकाज हे मागील अनेक वर्षापासून भाड्याच्या इमारतीत चालत असले तरी ती जागा अपुरीच पडत आहे.
कारण विविध दस्तावेज नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या लोकांना तेथे बसण्यासाठी अपुरी जागा आहे . साहजिकच नागरिकांना कोठेही बसावे लागते. महिला तशाच जागेवर बसतात. पुरुषांना तर आपले काम पूर्ण होईपर्यंत तसेच ताटकळत उभे राहावे लागते. त्यातच येथूनच इतर कार्यालयात कामकाजासाठी जाणाऱ्या, येणाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत असतो. वास्तविक या कार्यालयात दस्तावेज नोंदणी करण्याकरिता येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. ही वस्तू स्थिती लक्षात घेवून महसूल प्रशासनानेदेखील प्रशस्त कार्यालय त्यांना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती.
मात्र तसे झाले नाही.
Comments
Post a Comment