निलंगा नगरपालिका निवडणूक 2025 नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी 95 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात..
निलंगा नगरपालिका निवडणूक
नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी
निलंगा,दि.21
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी प्रशासन कार्यालय परिसरात प्रचंड गडबड, राजकीय हालचाली आणि अचानक घडामोडी पाहायला मिळाल्या. उमेदवार, त्यांचे समर्थक, पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि विविध पॅनेलचे प्रमुख यांनी तहसील कार्यालयाचा रस्ता धरला. दिवसभर चाललेल्या चर्चांमुळे वातावरण तंग राहिले
अनेक उमेदवारांनी सकाळ पासूनच अर्ज माघार घेणार असल्याचा लेखी अर्ज दाखल केले.तर काहींनी दुपारी अचानक निर्णय घेतला. काही उमेदवारांनी माघारीवर अधिकृत भूमिका मांडण्यास नकार दिल्याने “वरिष्ठांचे आदेश”, “गोपनीय समझोता”, “शेवटच्या क्षणी झालेली बैठक” अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.
काही प्रभागांमध्ये पक्षांतर्गत बंडाळी थांबवण्यासाठी वरिष्ठांनी थेट फोनवरून आदेश देऊन उमेदवारांना नामनिर्देशन माघार घ्यायला भाग पाडल्याचे समजते. तर काही ठिकाणी गैरसमज, अंतर्गत नाराजी आणि पॅनेलचे तडजोडीचे राजकारण ठळकपणे दिसून आले.
डमी उमेदवारांनी शांतपणे माघार घेतल्याने मुख्य स्पर्धकांना दिलासा मिळाला. काही ठिकाणी मात्र माघार देणारा उमेदवार शेवटच्या क्षणी अचानक प्रकट झाल्याने, एकाएकी पत्रकार, कार्यकर्ते आणि पक्षनेत्यांची दाट गर्दी झाली. काही प्रभागांत समर्थकांनी माघारीनंतर नेत्यांवर असंतोष व्यक्त करण्यात आला.
माघारीनंतर अनेक प्रभागांत सरळ दोन उमेदवारांमध्ये थेट लढत निर्माण झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांत चर्चा सुरू आहेत की, कोणत्या प्रभागात पकड मजबूत, कुठे बंडखोरांचा धोका, कुठे समझोत्याचा फॉर्म्युला लागू होणार. काही ठिकाणी सत्ताधारी गटाचे बंडखोर माघारी आल्याने पक्षाला मोठा दिलासा मिळाला.
काही ठिकाणी मात्र विधानसभा निवडणुकीतील कटूता आणि स्थानिक गटबाजीमुळे विरोधकांनी माघारीवर एकमत साधले नाही.
प्रशासनाने माघारीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त वाढवला होता. उमेदवारांची ओळख, कागदपत्रे, वेळेचे पालन, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी निवडणूक शाखा सतर्कपणे कार्यरत होती.
कार्यकर्त्यांचा चमू पक्षनिष्ठांचे घोषणाबाजी यामुळे वातावरण एकीकडे तणावपूर्ण तर दुसरीकडे राजकीय रंगाने भारलेले दिसत होते.
दुपारी प्रशासनाने वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली. काही प्रभागांत मोठ्या घडामोडी झाल्याने अंतिम लढत पूर्णपणे वेगळी दिसत आहे.
आता सर्व पक्षांचे लक्ष प्रचार मोहिमेवर, सभा, दारोदारी संपर्क आणि प्रभागनिहाय मतदारांना आकर्षित करण्यावर केंद्रित होणार आहे.
आजच्या माघारी दिवसाने एक गोष्ट स्पष्ट केली की,
या नगरपरिषद निवडणुकीत कोणतीही स्पर्धा सोपी नाही. आघाड्या, गटबाजी, बंडखोरी, दबाव आणि शेवटच्या क्षणी होणारे व्यवहार यामुळे स्थानिक राजकारणात भूकंपसदृश बदल झाले आहेत.
आज दि. 21 रोजी निलंगा नगर पालिका निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवशी
दुपारी तीन नंतर नगरअध्यक्ष पदासाठी एकूण सात (7)उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे शेख हमीद इब्राहिम, भाजपा हलगरकर संजयराज प्रमोद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रेशमे लिंबनअप्पा विश्वनाथ, वंचित बहुजन आघाडी सौदागर मुजीब रसिदसाब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून देशमुख अखिल जलील,तर अपक्ष म्हणून बंडखोर काँग्रेसचे पठाण महंमदखान हुसेनखान,अपक्ष सूर्यवंशी विजयकुमार दत्तू असेएकूण (07) सात उमेदवार रिंगणात आहेत.
तर सदस्य पदाच्या 23 जागेसाठी( 88) उमेदवार रिंगणात आहेत. या 88 उमेदवारापैकी (23 काँग्रेस पक्ष),(23 उमेदवार भाजपा),(09 उमेदवार वंचित बहुजन आघाडी),(07 राष्ट्रवादी अजित पवार गट),(12 राष्ट्रवादी शरद पवार गट),तर 14 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
यामुळे आता महाविकास आगाडीमध्ये सरळ सरळ 2 पॅनल दिसून येत आहेत. तर महायुती मधील अजित पवार गटाने 07 उमेदवार व 1 नगर अध्यक्ष पदासाठी रिंगणात उभे केल्याने भारतीय जनता पक्षाला मोठे आवाहन उभे राहिले आहे. तर काँग्रेस पक्षांमधून 1 अध्यक्ष पदासाठी व 12 सदस्य पदासाठी उमेदवारांनी बंड करून अर्ज कायम ठेवल्याने तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सदस्य पदासाठी व 12 उमेदवार व नगर अध्यक्ष पदासाठी शिवसेना उबाठा गटाने 1 उमेदवार रिंगणात राहिल्याने तर वंचित बहुजन आघाडीचे नगर अध्यक्ष पदासह 10 उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे निलंगा नगर पालीका निवडणूक ही बहुरंगी लढतीत होणार आहेत.
Comments
Post a Comment